पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई सुभेदार चित्रपटाची जोरदार घोडदौड!

हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने ५ करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जातोय.

चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘आले मराठे’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.
‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Leave a Comment

Exit mobile version