२८ ऑक्टोबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’!

मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करीत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर सायं. ७. ०० वा. आणि रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी. १२. ०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे. मुख्य सोहळ्याआधी शनिवारी सायं. ६. ३० वा. आणि रविवारी दुपारी ११. ३० वा. रेड कार्पेटची खास झलकही पहायला मिळणार आहे..
विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचा आस्वाद सलग दोन दिवस प्रेक्षकांना घेता येणार असून या सोहळ्याचे पूर्वरंग रविवार २२ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वा आणि सायं. ५. ३० वा. पहायला मिळणार आहेत.

मनोरंजनाचा ‘फूल ऑन तडका’, कलाकारांचे एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी असा जबरदस्त नजराणा असलेला हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूडमधले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ आणि ओंकार भोजने यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. अभिनेता शुभंकर तावडे याच्या सुरेख गणेश वंदनेने सोहळ्याला सुरुवात झाली. शिव ठाकरे, मानसी नाईक, वैदेही परशुरामी कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे मनमुराद मनोरंजन केले.

रुपेरी पडद्यावरील कलाकारांचे, त्यांच्या कामाचे पुरस्काररूपी कौतुक करण्यासाठी ‘फक्त मराठी वाहिनी’ तर्फे आयोजित करण्यात आलेला हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल, असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त केला.

फक्त मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ या रंगतदार सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी शनिवार २८ ऑक्टोबर आणि रविवार २९ ऑक्टोबर अवश्य राखून ठेवा.

Leave a Comment

Exit mobile version