‘प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील पहिला हिरो..’, ‘बापमाणूस’ उलगडणार वडील-मुलीच्या नात्यातील भावनिक बंध

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन यांचा ‘बापमाणूस’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी आपल्या भेटीस येत आहे. नुकतंच ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं. वडील- मुलीच्या नात्यातील प्रेमळ बंध या चित्रपटातील कथेत गुंफण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे.

‘बापमाणूस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगारे यांचे आहे. आनंद पंडित,रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर वैशल शाह,राहुल दुबे चित्रपटाचे सह-निर्माते आहे. पुष्कर जोग,किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले यांनीही ‘बापमाणूस’चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा इमिआरा हिची आहे. सोपान पुरंदरे चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत तर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रवी झिंगाडे यांनी सांभाळली आहे.

वडील आणि मुलीमधील नातं नेहमीच खूप भावूक राहिलं आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात पहिला पुरुष येतो तो तिचा बाबा..आणि तोच तिचा पहिला हिरो,सुपरहिरो सगळं काही असतो. अनेकदा मुलासाठी कठोर निर्णय घेणारे बाबा आपल्या मुलीसाठी नेहमीच हळवे होताना दिसतात. असाच एक बाबा ‘बापमाणूस’ चित्रपटातून आपल्या भेटीस येत आहे. काही गोष्टी पुरुषांना जमत नाहीत.. एकटा बाप मुलीचा सांभाळ करू शकत नाही या समाजाच्या मानसिकतेला चोख उत्तर ‘बापमाणूस’ या चित्रपटातून देण्यात आलं आहे. ‘व्हिक्टोरिया’ या आपल्या हॉरर चित्रपट निर्मितीनंतर आता प्रेक्षकांसाठी बाप-मुलीच्या नात्याची भावनिक गोष्ट घेऊन येण्यास आपण उत्सुक आहोत असं निर्माते आनंद पंडित म्हणाले.

Leave a Comment

Exit mobile version