उपेंद्र आणि वीणाची जोडी जमली!

नेमक्याच तरीही सशक्त भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर ही नाव आवर्जून घेतली जातात. हे दोन चतुरस्त्र कलाकार आता ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. २८ जुलै ला ‘आणीबाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले. केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपटाचा वेगळा विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

Leave a Comment

Exit mobile version