जेष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं दुःखद निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यामध्ये पहाटे त्यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जन्म बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावात झाला. लहानपणापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अंमलदार’ या नाटकात हणम्या ही भूमिका साकारली होती. जयराम यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस. पी. काॅलेजतून झाले. जयराम यांनी १९५६ मध्ये पुण्यातील आकाशवाणी केंद्रामध्ये नोकरी केली. त्यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले.

जयराम कुलकर्णी यांनी आजवरच्या कारकीर्दीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केल आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘माझा पती करोडपती’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खर कधी बोलु नये’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘थरथराट’, ‘भूताचा भाऊ’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’ यांसारख्या चित्रपटांतून विविध भूमिका साकारून आपली ओळख मराठी सिनेसृष्टीत निर्माण केली.

जयराम कुलकर्णी यांच्या पत्नीचे नाव डाॅ. हेमा कुलकर्णी तर मुलगा रूचीर हा वकील आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही त्यांची सून आणि विराजस कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे.

Title: Jairam Kulkarni Passes Away

Tags: Jairam Kulkarni, Jayram Kulkarni, Jairam Kulkarni Passes Away, Jairam Kulkarni Nidhan, Jairam Kulkarni Movies

Leave a Comment

Exit mobile version