भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या नावाजलेल्या कलाकारांपैकी एक राणी मुखर्जी ही दमदार व्यक्तीरेखेचा समावेश असलेली फ्रँचाईझी आपल्या नावावर असलेली एकमेव अभिनेत्री आहे. मर्दानी या ब्लॉकबस्टर फ्रँचाईझीमध्ये राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
राणी म्हणाली, ‘मर्दानी फ्रँचाईझीचा मला खूप अभिमान वाटतो. एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिकेतून स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून समाजात बदल घडवून आणणारी स्त्री म्हणून आपण योगदान देऊ शकतो याची मला जाणीव झाली.’
ती पुढे म्हणाली, ‘मी महत्त्वाकांक्षी, स्वावंलबी, धाडसी, करारी, ठाम अशा विविध छटा असलेल्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. सिनेमातल्या स्त्री व्यक्तीरेखा कशा असाव्यात याच्या माझ्या व्याख्येत मर्दानी चपखल बसते. त्यामुळे मी ही व्यक्तीरेखा साकारताना 200 टक्के मेहनत घेऊ शकले.’
मर्दानीतील व्यक्तीरेखा- शिवानी शिवाजी रॉय आणि आपल्यात खूप साधर्म्य असल्याचं राणीला वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात आपला स्वभावही तिच्यासारखा आहे असं राणी सांगते.
राणी म्हणाली, ‘मी आणि शिवानी सारख्याच आहोत. आमच्यात काही फरक नाही. मी सुद्धा कधीच कुणाकडून आयुष्य कसं जगावं याचे सल्ले घेतलेले नाहीत. मी स्वबळावर माझ्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड दिलं आहे आणि शिवानी शिवाजी रॉयसुद्धा तशीच आहे. कदाचित म्हणूनच लोकांना ही फ्रँचाईझी आणि माझी व्यक्तीरेखा आवडत असावी, कारण कुठेतरी या पोलिसाच्या भूमिकेत मी स्वतः आहे तशीच वागत असते.’
मर्दानी फ्रँचाईझी भारतीय सिनेमाच्या इतिहासाची समीकरणे बदलवणारी ठरली आहे. ही फ्रँचाईझी लिंगभेदाचे नियम छेदणारी आहे. शिवाय, कशाप्रकारे एक स्त्री बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवू शकते आणि फ्रँचाईझी पुढे नेऊ शकते हे दाखवणारी आहे.
‘मर्दानी फ्रँचाईझी लिंगभेदाचे नियम मोडणारी आहे, कारण एका स्त्री व्यक्तीरेखेने फ्रँचाईझीला यश मिळवून दिलं आहे. मला आशा आहे, की या फ्रँचाईझीचं यश स्त्री प्रमुख भूमिका असलेले सिनेमे बनवण्यासाठी प्रेरणा देईल.’