महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा दाक्षिणात्य अंदाज!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा दाक्षिणात्य अंदाज!

चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल माध्यमावर शेअर करण्यात आला आहे. ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता, ‘एकदा येऊन तर बघा’ असं म्हणत तिने रसिकांना थेट चित्रपटाचं आमंत्रण दिलं आहे.

येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास ती व्यक्त करते. या चित्रपटात तिच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने आदि तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

२४ नोव्हेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ ही ‘मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस’ आपल्या भेटीला येणार आहे.

Shamshad Sayyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *