गणेशोत्सव जवळ आला आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमन होणार आहे. अनेक गणेशभक्तांप्रमाणे झी मराठीचे कलाकार देखील हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. बाप्पाचा आगमनाचा उत्साह व्यक्त करतांना अशोक शिंदे (रघुनाथ, सारं काही तिच्यासाठी) म्हणाले,’ माझ्या यशस्वी करिअर मध्ये बाप्पाचा खूप मोठा वाटा आहे ह्याच कारण म्हणजे मी पाचवीत असतांना मी पुण्याच्या दगडूशेठ गणपती चित्रकलेच्या स्पर्धा असायच्या आणि मी नेहमी त्या स्पर्धेत भाग घ्यायचो सलया स्पर्धेत सलग तीन वर्ष मी पहिला नंबर पटकावलेला आहे. माझे वडील उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट होते आणि त्यांची कला माझ्या हातात उतरली.मी जेव्हा १० वर्षांचा झालो तेव्हा रस्त्या वरून जाताना एक दुकानात बाप्पा बघत होतो आणि तेव्हा मला अचानक एक प्रश्न पडला बाप्पा कसा बनवतात बरं ,मी नाही का बनवू शकत? त्या नंतर मला एक कल्पना सुचली आणि मी थोडी शाडू माती विकत घेतली आणि कोणालाही न सांगता मी शाडू मातीचा छोटा गणपती बनवला. मी घाबरून आई बाबांना मूर्ती दाखवली, आधी त्यांचा विश्वासच बसला नाही पण नंतर त्यांना खूप आनंद झाला.
आई ने उत्साहात येऊन सांगितले कि मूर्तीला पेंट कर, आपण घरी याच गणपतीची स्थापना करूयात. तेव्हा आम्ही गणपतीची स्थापना करून मनोभावे पूजा केली व सालंकृत पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. त्या वेळेपासून आतापर्यंत ४८ वर्ष झाली आम्ही गणपतीची स्थापना करतो व पारंपरिक पद्धतीने त्याची पूजा करतो. आमच्या घरी पंच पक्वांनांचा प्रसाद करतो. मी आणि माझे कुटुंब सर्व प्रकारे बाप्पाची सेवा करतो. बाप्पाच्या कृपेने मला आजपर्यंत खूप प्रोजेक्ट्स मिळत गेले आणि मला नेहमी कामात व्यस्त ठेवले. माझी झी मराठीवर सुरु असलेली ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेला देखील बाप्पाचा आशीर्वादाने खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. ह्या वर्षीही बाप्पाचे तेवढ्याच उत्साहाने आगमन होईल आणि आम्ही नेहमी प्रमाणे त्याची सेवा करू. सगळ्या रसिकप्रेक्षकांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून गणेश चतुर्थीच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा !
कविता लाड मेढेकर (भुवनेश्वरी, तुला शिकवीन चांगलाच धडा) म्हणाल्या, की ‘आमच्या मेढेकर घराण्यात पारंपरिक गौरी गणपतीची वर्षानुवर्षे स्थापना होत आली आहे. दरवर्षी आमच्या घरी खूप जल्लोषाने आम्ही बाप्पाचे स्वागत करतो. गौरी गणपती म्हटलं की छान प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. आपले दूरचे नातेवाईक आपल्या घरी येतात त्यामुळे खूप खेळीमेळी चे वातावरण असते. सगळे मोदक आणि प्रसाद बनवण्यासाठी खूप उत्साहीअसतात. आधी मी आणि माझ्या सासूबाई सगळं सांभाळून घ्यायचो, माझ्या सासूबाईंच्या निधनानंतर माझ्या सास-यांनी मला विचारले कि तुझ्या कामाच्या व्यापात तुला सगळं सांभाळायला जमेल का? पण मी ते आव्हान स्वीकारलं आणि मनाशी ठरवले की जो पर्यंत करता येईल तो पर्यंत व्यवस्थित नेहमी प्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या.
मला खूप अभिमान वाटतो की माझ्या सास-यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली.आमच्या पारंपरिक गणपतीची सेवा करण्यास खूप खूप समाधान मिळतं. अगदी ह्या वर्षी सुद्धा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक इतक्या व्यस्त शेड्युलमुळे सगळं नीट जमेल की नाही याची धाकधुक होती, पण माझ्या दोन्ही निर्मिती संस्था आणि झी मराठी वाहिनी यांनी खूप सांभाळून घेतलं आणि सगळं कसं व्यवस्थित झालं. मी बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत आहे. गणपती बाप्पा मोरया .. मंगल मूर्ती मोरया.’


