स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात असलं तरी खरा सचित राजे मात्र दुसराच आहे. मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार असून ही भूमिका साकारण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे.
अबोली मालिकेतल्या सचित राजे या भूमिकेद्दल सांगताना सुयश म्हणाला, ‘हे पात्र साकारणं खरच आव्हानात्मक आहे. मालिकेत वेगवेगळी रुपं मी घेणार आहे. कधी मी स्त्रीवेशात असेन तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी रिक्षावाला असेन तर कधी कडकलक्ष्मीच्या रुपात. अभिनेता म्हणून हे सगळं साकारताना माझी कसोटी लागतेय. एरव्ही मला तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मात्र ही वेगवेगळी रुपं साकारण्यासाठी तयार होताना बरीच मेहतन घ्यावी लागतेय.
मी आजवर ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यापेक्षा वेगळी आणि हटके अशी ही व्यक्तिरेखा आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत मी बऱ्याच मालिका केल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जातोय याचा आनंद आहे. सचित राजेचा मनसुबा नेमका काय आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी पाहायला विसरु नका अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’
आतापर्यंतची सुयश टिळकची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली? अबोली मालिकेत सुयशला सचित राजेच्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.







