क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप हे लतिका आणि अभिमन्युच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं असं म्हणायला हरकत नाही. अभिमन्यू आणि लतिकाच्या या प्रवासामध्ये अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले आणि आता प्रेक्षकांना दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट बघायला मिळते आहे. एका मुलाच्या जश्या जोडीदाराबाबत अपेक्षा असतात तश्याच मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट हवी होती पण काही गोष्टी घडल्या आणि अभिमन्यू – लतिका लग्नबंधनात अडकले. या प्रवासात अभिमन्यूचे लतिकाबाबतीतचे मत बदलायला हळूहळू सुरुवात झाली आणि तो तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला, ती जशी आहे तशी तिला त्याने स्वीकारले. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्वाचे हे त्याला कळाले आणि ही सुंदरा अभिच्या मनामध्ये भरली. आता अवघा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत आहे ती मालिकेत घडणार आहे. ज्यामुळे लतिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कारण ज्या समाजाने तिला बेढब ठरवले, तिला हिणवले, तिला दूषण लावली, तिला नकार दिला त्यांना लतिका दमदार उत्तरं देणार आहे. आता “लतिका” देखील सौंदर्याच्या परिमाणात बसणारी मुलगी आहे हे ती पटवून देणार आहे. मालिकेत लवकरच शर्यत बघायला मिळणार आहे. लतिका बापूंच्या विरोधात जावून अभ्याच्या बाजूने मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून त्याची पहिल्यांदाच साथ देणार आहे. सगळ्यांना अभिमन्यू आता शर्यतीत हरला असं वाटतं असतानाच लतिका जोखड घेऊन शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. हे जोखड म्हणजे लतिकासाठी एखादी वस्तु नसून तिच्या आयुष्यात जे काही न्यूनगंड होते, तिचे समज होते, या सगळ्या गोष्टींचा भार असलेली ती वस्तु म्हणजे जोखड. लतिका असं समजून या शर्यतीत लतिका भाग घेणार आहे. लतिका ही शर्यत कोणाविरुध्द, कोणासाठी लढणार नसून पहिले ती ही शर्यत स्वत:साठी लढणार आहे. ही शर्यत कशी रंगणार ? कोणत्या अडचणी लतिकासमोर येणार ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असतील त्याची लवकरच उत्तरं मिळणार आहेत. मराठी टेलिव्हीजनवर पहिल्यांदाच रंगणार्या या शर्यतीमध्ये आपण सगळे सहभागी होऊया. तेव्हा नक्की बघा “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेचा विशेष सप्ताह १६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
याबद्दल बोलताना अक्षया नाईक (लतिका) म्हणाली, “एखादी गोष्ट मिळविण्यासाठी फक्त शारीरिक बळ महत्वाचं नसतं, तर तुमचं मानसिक बळ देखील तितकचं महत्वाच असतं आणि त्याच एका गोष्टीमुळे लतिकाने जिद्द ठेवली तिने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत जोखड घेऊन शर्यत लढली. यामधून हे प्रेक्षकांना नक्कीच कळेल अशी मी अशा करते की, आपलं शरीर हे आपलं फक्त वर्णन करतं, परिभाषा सांगत नाही. ही शर्यत लतिकाच्या आयुष्यात खूप महत्वाची ठरणार आहे, कारण आयुष्यभर तिला ज्या गोष्टीसाठी हिणवल गेलं त्यामुळे तिच्यातली “ती” हरवली गेली. बिनधास्त मुलगी तिने शाळेतल्या शर्यतीमधून भाग घेणं देखील सोडलं, का तर तिच्या जाडेपणामुळे आलेल्या न्यूनगंडामुळे. यामुळेचं तिने स्वत:चा समज करून घेतला की ती सुंदर नाहीये, ती आयुष्यात काहीच करू शकणार नाही, तिला कोणीच पसंत करणार नाही आणि आता हीच शर्यत सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम लावणार आहे. लतिका अशा मुलींच प्रतिनिधित्व करते ज्यांचं आजवर कोणीच प्रतिनिधित्व केलं नाही. मला असं वाटतं ती यशाची पहिली पायरी तिने तेव्हा गाठली जेव्हा तिने स्वत:च्या मताशी ठाम राहून बापूंनी आखून दिलेली लक्ष्मणरेषा पार केली”.
लतिकासाठी ही शर्यत समाज आणि त्यांचे विचार, न्यूनगंड यांच्या विरोधात आहे जी तिला जिंकायची आहे तुमची साथ लतिकाला मिळेल याची खात्री आहे. चला तर मग सहभागी होवूया मराठी टेलिव्हीजनवर रंगणार्या पहिल्या शर्यतीमध्ये १६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.