स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे. शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. ज्या जोडीला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं ती जयदीप-गौरीची लोकप्रिय जोडी अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या वळणासह मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल.
पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडतील. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं २० नोव्हेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.



