शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘सुभेदार… गड आला पण…’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत ‘सुभेदार… गड आला पण…’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
‘सुभेदार’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं यथार्थ दर्शन घडवणारा आहे. सुभेदारांचे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणारा आहे. त्या संदर्भातील अत्यंत भावनिक करणारे प्रसंग या सिनेमात अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत. त्या काळातील आजूबाजूची सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग ‘सुभेदार’मध्ये आहेत. उदाहरणार्थ जना गराडीणचा प्रसंग… अलका कुबल यांनी ती भूमिका सुरेखरीत्या साकारली आहे. एका भाबड्या स्त्रीच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराज कसे त्यांच्या गड-किल्ल्यांविषयी महत्त्वाची भूमिका घेतात हे दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून परतल्यानंतर आऊसाहेब आणि त्यांची अत्यंत भावनिक व हृद्य भेट दर्शवणारा प्रसंग डोळ्यांच्या कडा ओलावणारा आहे. प्रत्यक्ष सिंहगडाची भौगोलिक माहिती आणि सिंहगड का जिंकायला हवा याची विविध कारणं या चित्रपटात विस्तृतपणे मांडण्यात आली आहेत. ही माहिती संपूर्णपणे ऐतिहासिक आणि भौगोलिक तथ्यांवर आधारलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असलेल्या एका महत्त्वपूर्ण अध्यायाची अधिकृत आणि इत्तंभूत माहिती देतो.
आजवर प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टकातील चारही चित्रपटांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला असून, ‘सुभेदार’साठी दिग्पाल लांजेकर यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे केलेले अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन रसिकांना शिवकाळात नेणारे आहे. अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची शीर्षक भूमिका सशक्तपणे साकारली आहे. जिजाऊंच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर यांनी आणि तान्हाजीरावांच्या व्यक्तिरेखेतील अजय पूरकर यांनी आपापल्या व्यक्तिरेखेच्या वयातील विविध टप्पे उत्तमरीत्या सादर केले आहेत. या सर्वच मातब्बर कलाकारांच्या कसदार अभिनयाची छाप या चित्रपटावर उमटल्याचं पाहायला मिळतं. उदयभान राठोडच्या भूमिकेत दिग्विजय रोहिदास हा नवीन कलाकार लक्ष वेधून घेतो. दिग्विजय जरी नवोदित असला तरी उदयभानच्या व्यक्तिरेखेत कुठेही नवखेपणा जाणवणार नाही अशा तऱ्हेने त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. उदयभान या व्यक्तिरेखेच्याही विविध बाजू या चित्रपटात आहेत.
तांत्रिक बाबींमध्ये प्रियांका मयेकरचं छायाचित्रण उत्तम आहे. यापूर्वी शिवराज अष्टकमधील प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांच्या तोलामोलाची किंवा त्याहीपेक्षा सुरेख सिनेमॅटोग्राफी यात आहे. या चित्रपटातील गाणी खूप गाजत असून, सगळी चार्टबस्टर आहेत. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. शेवटच्या युद्धाचं डिझाईन खूप जोरकस झालेलं असून, थरार वाढवणारं आहे. सिंहगडावर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे प्राणपणाने लढत असताना ते कधी विजयी होतात याची छत्रपती शिवराय राजगडावर आतुरतेनं वाट पाहात असलेल्या प्रसंगाची भावनिक किनारही यात आहे. राजांच्या बाहुंमध्ये सुभेदार प्राण सोडतात तो अतिशय रोमांचक आणि हेलावून टाकणारा क्षणही यात आहे. याखेरीज अन्य तांत्रिक बाजूही लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. एकूणच सुभेदार तानाजीराव मालुसरे या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण धांडोळा घेणारा हा चित्रपट आहे. यातील तान्हाजीरावांच्या प्रशासकीय व कुटुंबवत्सल रुपासोबत त्यांच्यातील योद्धाही मनात खोलवर ठसतो आणि कायमचा स्मरणात राहणारा ठरतो.








