नाणं खणखणीत असलं की, ते कुठेही वाजतंच. त्याला मग भाषा,प्रांत, प्रदेश यांच्या मर्यादा राहत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाने आणि सुभेदारांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते अजय पूरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘स्कंदा’ या दाक्षिणात्य अॅक्शन चित्रपटात अभिनेते अजय पूरकर खलनायकाच्या जबरदस्त भूमिकेत दिसणार आहेत.
विशेष म्हणजे अजय पूरकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांना प्रचंड आवडली. अजय पूरकर यांनी त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे त्यांना खूप कौतुक वाटले. ‘स्कंदा’ चित्रपटाचे डीओपी संतोष देटाके यांनी अजय पूरकर यांचं काम पाहिलं होतं. या कामाची माहिती त्यांनी दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांनाही दिली होती. हे काम पाहूनच अजय पूरकर यांना ‘स्कंदा’ चित्रपटाच्या विशेष भूमिकेसाठी विचारण्यात आले.
आपल्या कामावर इतकं बारकाईनं लक्ष ठेवून दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने याची नोंद घेणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे ते सांगतात. तसेच हैद्राबाद येथील चित्रीकरणादरम्यान कामाविषयी पावित्र्य जपत प्रत्येक दिवशी वेगळी पूजाअर्चा करण्याचा अनुभव खूप काही सांगून जाणारा व शिकवणारा असल्याचे अजय पूरकर सांगतात. अनुभवसमृद्ध वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने स्वत:चा असा वेगळा आयाम तयार केला आहे. त्यांची व्यावसायिकता, कामाप्रतीची श्रद्धा, उत्तम व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. ‘स्कंदा’ या चित्रपटामुळे या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्याचा आनंद व्यक्त करतानाच, एका उत्तम कॅनव्हासवर काम केल्याचा आनंद, अजय पूरकर यांनी व्यक्त केला.
‘स्कंदा’ चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. या प्रमोशन दरम्यान सुप्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांनी अजय पुरकर यांचे भरभरून कौतुक केलं, चित्रपटाच्या प्रमोशनच्या खास सोहळ्यात त्यांनी अजय पूरकर आणि ‘सुभेदार’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.