नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवडच्या घरात आज सकाळी एक तरुण घुसला . नकली बंदूक आणि स्वयंपाकघरात वापरला जाणारा चाकू घेऊन हा २४ वर्षीय तरुण सकाळी साडेसातच्या सुमारास घरात आला . त्या तरुणाचे नाव अजय शेगटे असे असुन तो २४ वर्षांचा आहे. तो ज्यावेळी घरात आला त्यावेळी सोनालीचे आई वडील दोघेच घरात होते. सोनालीच्या वडिलांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला , त्याचवेळी झालेल्या झटापटीत सोनालीच्या वडिलांना चाकूने इजा झाली . अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार सोनालीच्या वडिलांनी केली आहे. तपासदरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले .
इमारतीतल्या रहिवाशांनी याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले . त्यानंतर पोलिसांना लगेचच बोलवून अजयला त्यांच्या ताब्यात दिले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. निगडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.