फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या याच टुरिंग टॉकीज मध्ये आता ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय मागे पडला असला तरी जुनं ते सोनं या उक्तीनुसार दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी टुरिंग टॉकिजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. शुक्रवार २३ जूनपासून टुरिंग टॉकीज मध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टुरिंग टॉकीजचा आगळा अनुभव प्रेक्षकांना परत मिळणार हे विशेष.
टुरिंग टॉकीज मध्ये चित्रपट दाखवण्याबाबत दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात की, टुरिंग टॉकीज ही केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते ती एक संस्कृती होती, पण अगदी जत्रा- यात्रांतही आकर्षण असणारे तंबू कालपरत्वे दुरापास्त होऊ लागले. अशा टुरिंग टॉकीजने ग्रामीण भागातल्या रसिकांचे रसिकत्व जपले. वाढविले. आजच्या बदलत्या मनोरंजन साधनांमुळे टुरिंग टॉकीज हे काहीसं मागे पडलं असलं तरी चित्रसृष्टी बहरण्यासाठी तसेच आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी या माध्यमातून ही प्रयत्न झाले पाहिजेत त्यासाठीच ‘रावरंभा’ चित्रपट टुरिंग टॉकीज च्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. चित्रपटगृहात रसिकांनी ‘रावरंभा’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. टुरिंग टॉकीजमध्ये ही हाच प्रतिसाद नक्की मिळेल असा मला विश्वास आहे.
शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा चित्रपटात ओम भूतकर, मोनालिसा बागल, शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर,कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल,मयुरेश पेम, अश्विनी बागल, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार,शशिकांत पवार आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत.