Premachi Gosht Tejshree exit : मराठी मालिकाविश्वातील एक प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या सहजसुंदर आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिच्या कोणत्याही मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मालिकाविश्वात आपलं अस्तित्व सिद्ध केल्यानंतर तेजश्री आता मराठी सिनेसृष्टीतही चांगलीच सक्रिय झाली आहे. गेल्या काही काळात तिने वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे तिची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये तेजश्रीने एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत आता एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. तेजश्रीच्या जागी स्वरदा ठिगळे ही अभिनेत्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकणार असल्याचं समजतंय. स्वरदा ठिगळे मराठी तसेच हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. तिने यापूर्वीही अनेक दमदार भूमिका साकारल्या असून मुक्ताच्या भूमिकेत ती कशी साजेशी ठरेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
Lakhat ek Maza Dada : झी मराठीच्या या मालिकेवर भडकले प्रेक्षक म्हणाले, आमच्या पोरांनी हे शिकायचं का?
तेजश्रीने ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिच्या जागी स्वरदा ठिगळे ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वरदाबद्दल बोलायचं झालं तर, तिने २०१३ साली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर स्वरदा हिंदी मालिकांमध्येही झळकली. ‘सावित्री देवी कॉलेज’ आणि ‘प्यार के पापड’ या हिंदी मालिकांमधूनही तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली होती. नंतर ती पुन्हा मराठी मालिकांकडे वळली आणि ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत तिने ताराराणींची भूमिका साकारली. या दमदार भूमिकेसाठी स्वरदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. गेल्या वर्षी स्वरदाने लग्न केलं असून आता ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
दुसरीकडे, तेजश्री प्रधानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘दर्मियान’ या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग झाली होती. हा चित्रपट मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता आणि प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. २०२४ या वर्षात तेजश्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अभिनयातलं तिचं कौशल्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे ती आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
प्रेक्षकांसाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतला बदल मोठा असेल, पण स्वरदाच्या अभिनयासाठीही तितकीच उत्सुकता असेल. तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे आणि स्वरदाच्या मालिकेतील प्रवासाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.