अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी नेहमीच प्रतिथयश कलाकारांसोबत नवोदितांनाही आपल्या चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर ब्रेक देण्याचं काम केलं आहे. यापैकी अनेक नावारूपाला आले तर काही पुढे सुपरस्टारही झाले. आज मराठी सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांनीही नेहमीच रॅा टॅलंटचा शोध घेऊन गाव-खेड्यांतील कलाकारांसाठी झगमगत्या चंदेरी दुनियेचं द्वार खुलं केलं आहे. नागराज आणि मकरंद यांच्या ‘बापल्योक’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे पायल जाधव ही नवोदित अभिनेत्री सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. राष्ट्रीय पारितोषिकाला गवसणी घालणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा आगामी चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.
मूळचे शेतकरी असलेले पायलचे वडील पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे गाव सोडून पुण्यात आले. सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिपाई म्हणून काम करू लागले. याच शाळेत पायलने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर पुणे युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली. ललित कला केंद्रामध्ये ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ केले. आता ‘बापल्योक’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याबाबत ती म्हणाली की, ‘बापल्योक’ हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे. या सिनेमाने मला नवी वाट दाखवली. मकरंदसर, शशांकसर, विजय शिंदे, नीनाताई, योगेश कोळीसर, विजय गावंडे सर यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल, असेही पायल म्हणाली.
एक फ्रेश चेहरा ही ‘बापल्योक’ या चित्रपटाच्या पटकथेची खरी गरज असल्याने आॅडीशन घेऊन बऱ्याच तरुणींमधून पायलची निवड केल्याचं मकरंद माने यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, पायल जरी नवखी असली तरी तिने खूप मेहनत घेऊन आपली व्यक्तिरेखा चित्रपटात आत्मविश्वासाने साकारली आहे.



