चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ही उक्ती खरं करत असल्याचं दिसत आहे. जवान चित्रपटात शाहरूख खानच्या तोंडी असलेले काही संवाद राजकीय नेत्यांना प्रेरणा देत असल्याचं समोर आलं आहे. अनेक नेत्यांनी ‘जवान’मधील शाहरूखच्या तोंडी असलेल्या मतदारांच्या आवाहनाची तारीफ केली असून त्याचे व्हीडिओ ट्वीट केले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करत हा चित्रपट राजकीय साक्षरतेला चालना देत असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच या चाकोरीबाहेरच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी जवानचं कौतुकही केलं आहे.
जवान चित्रपटात राजकीय साक्षरता आणि सुशासन यांचं महत्त्व सांगणारे अनेक संवाद आहेत. त्याबाबतचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींवर राजकीय यंत्रणेचं नियंत्रण असतं, असं म्हणत हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जवान चित्रपटात शाहरूख खान कॅमेऱ्याच्या आधाराने लोकांना प्रोत्साहन देणारं भाषण करताना दाखवला आहे. त्यात तो तुमचं एक बोट काय कमाल करू शकतं, याबद्दल बोलतोय. छोट्यातली छोटी वस्तू विकत घेताना आपण चिकित्सा करतो. पाच तास चालणारी कछवा-छाप अगरबत्ती घेताना हजारो प्रश्न विचारतो, पण पाच वर्षं चालणारं सरकार निवडताना लोकप्रतिनिधींना काहीच प्रश्न विचारत नाही, अशी भूमिका शाहरूखने यात मांडल्याचं दिसतंय. तुमच्याकडे मत मागायला येणाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत. ते निवडून आल्यानंतरही ते तुम्हाला उत्तरदायी आहेत, हे लक्षात ठेवायला हवं, असं आवाहनही या चित्रपटातील शाहरूखचं पात्र करतं.
या व्हीडिओला लोकांची तुफान पसंती मिळत असून काही राजकीय नेत्यांनीही त्याची प्रशंसा केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे तरुणांचा आवाज म्हणून ओळखले जातात. राजकीय साक्षरतेबद्दल त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. राजकीय साक्षरता महत्त्वाची असून खूप विचारपूर्वक मतदान करा, असं म्हणत त्यांनीही हा व्हीडिओ ट्वीट केला आहे.
राजकीयदृष्ट्या साक्षत होण्यासाठी एक चांगला नागरिक असणं आवश्यक आहे. कोणती यंत्रणा कशी कार्य करते, हे समजलं, तर राजकीय चौकट समजणं सोपं जाईल. राजकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करते की नाही, याची नागरिकांनी खात्री करणं, हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे, असं आमदार तांबे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. एखादा लोकप्रतिनिधी चुकला, तर तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता, त्याला जाब विचारता आला पाहिजे, ही खरी लोकशाही आहे. जवान चित्रपटही हेच सांगतो, असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.