स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे… बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील…अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात आणि विशेषणे लावली जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित, गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती करत आहेत मराठीतील आघाडीचे कलाकार. स्वप्नील जोशीची पहिलीच चित्रपट निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ नावाचा हा चित्रपट लिहिला आहे मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी ह्यांनी आणि दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी.
‘नाच गं घुमा’ ही ज्येष्ठ लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली कथा असून महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्या संबधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्त्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धी-भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. या चित्रपटाची आज घोषणा केली गेली आणि त्या निमित्ताने एक छोटेखानी टीझर प्रदर्शित केला गेला. चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.
कुलकर्णी यांनी ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही संकल्पना ऐकवली नी त्यांना ती खूप आवडली. मोकाशी यांनी सहलेखक म्हणून या संकल्पनेला एक वेगळी उंची दिली. त्यानंतर मग निर्मितीसंबंधी चर्चा झाली तेव्हा, सर्वांनी त्यांचे सर्वकाही पणाला लावायचे ठरवले. परेश मोकाशी, मधुगंधा त्याची फिल्म त्याच्या पैशांनी करणार होतेच पण शर्मिष्ठा राऊत आणि त्यांचे पती तेजस देसाई तसेच स्वप्नील जोशी यांनीही ती जबाबदारी घ्यायची ठरवले.
स्वप्नील जोशी यांनी या चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिले आहे, “घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत….आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा…‘नाच गं घुमा. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !”
“सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या चित्रपटाच्या वाचनासाठी बोलावले. ते हसून हसून हैराण झाले . स्वप्नीलने विचारले, ‘मी काय करू? गोष्ट बायकांची आहे तर मी साडी नेसून रोल करतो.’ परेश म्हणाला, ‘नाही. तू काहीच करायचे नाही. तुला यात रोल नाही.’ त्यावर स्वप्नील म्हणाला, ‘मग मी निर्मात्याचा रोल करतो.’ परेश मधुगंधा घाबरले. स्वतःच्या पैशांचा जुगार खेळणे वेगळे पण मित्राच्या पैशाशी मस्ती करू शकत नाही. पण तो मागे हटला नाही. म्हणाला, ‘हे स्क्रिप्ट स्त्रियांचे आहे आणि त्यामागे उभा राहिलो तर ती जगातील सर्व ‘बेटर हाफ’प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असेल.’ स्वप्नीलची व्यवसायातील पार्टनर तृप्तीने लगेच आर्थिक भाग उचलायचे कबुल करून त्यात उडी मारली. नव्याने मालिकांच्या निर्मितीत उतरलेले शर्मिष्ठा आणि तेजस मागे हटणार नव्हते. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला,” कुलकर्णी म्हणाल्या.
मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि व चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती नंतर ‘हिरण्यगर्भ मनोरंजन ही पुढील प्रस्तुती करत आहे. या चित्रपटांशी संबंधीत सर्वजण एकत्र येत असल्याने ‘नाच गं घुमा’विषयी रसिकांमध्ये उत्सुकता असणार आहे. ‘नाच गं घुमा’चे निर्माते आहेत परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत -देसाई, तेजस देसाई, तृप्ती पाटील. दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी तर लेखक आहेत मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी.
“स्त्री या निसर्गाचा मास्टरपीस आहे, असे म्हणतात. स्त्री-पुरुषांच्या मेंदूचे वायरिंगच वेगळे असते. बाई कळत नाही, असे म्हटले जाते पण ते म्हणणारे पुरुष असतात. बाई बाईला बरोबर कळते…. आजची महिला ही बुद्धी आणि भावनेचे एक अचूक मिश्रण असते. बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, पण ते देश मात्र एकमेकांशी बोलणार नाहीत…अशा अनेक गमती-जमती स्त्रीत्त्वभोवती फिरतात. त्याचा या चित्रपटात अंतर्भाव असणार आहेत,” कुलकर्णी म्हणतात.



