माझं आणि माझ्या आईचं नातं अगदी जिवलग मैत्रीणींप्रमाणेच आहे. आम्ही खूप जास्त घट्ट मैत्रीणी आहोत. मी कोणतीच गोष्ट आईपासून लपवून ठेवत नाही. तिला पाहिलं की आपसुकच माझ्या तोंडून एक एक गोष्ट बाहेर पडायला लागते. आणि हेच माझ्या आईच्या बाबतीतही आहे. माझी आई देखिल कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. आम्हा दोघींची एकमेकींना साथसोबत आहे. माझी आई गृहिणी आहे. तिला क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडतात. तिची कलात्मकता अगदी स्वयंपाकापासून ते अगदी घरातल्या सजावटीच्या वस्तून बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत डोकावत असते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला फार आवडतात.
माझा स्वभाव आईच्या पूर्णपणे वेगळा आहे. माझी आईला कोणतीही गोष्ट खटकली तर ती तिथल्या तिथे बोलून मोकळी होते. मी मात्र पूर्णपणे वेगळी आहे. मी लगेच रिअक्ट होत नाही. आईचं नेहमी मला सांगणं असतं की खटकणारी गोष्ट लगेच बोलून दाखवावी. मनात ठेऊ नये. तिच्यातला एक गुण कोणता जर मी घेतला असेल तर तो आहे पेशन्स. अभिनय क्षेत्रात यायचा मी जेव्हा विचार केला तेव्हा सुरुवातीला तिचा नकार होता मात्र माझी आवड आणि चिकाटी पाहून तिने मला खंबीर पाठिंबा दिला. माझ्या प्रत्येक ऑडिशनला आणि शूटला ती नेहमी माझ्यासोबत असते.
मालिका क्षेत्रात माझी सुरुवात झाली ती स्टार प्रवाहच्याच दुहेरी या मालिकेपासून त्यानंतर प्रेमा तुझा रंग कसा, विठुमाऊली या मालिकांमध्येही मी छोटे छोटे रोल केले. त्यानंतर मला स्टार प्रवाहच्याच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली. माऊ ही व्यक्तिरेखा मी या मालिकेत साकारते आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. माऊला बोलता येत नाही. त्यामुळे ती हावभावांच्या माध्यमातून संवाद साधते. मनातली भावना न बोलता हावभावांमधून साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे.
सेटवर आमचे दिग्दर्शक, सहकलाकार यासाठी मला खूपच मदत करतात. मी sign language शिकली नाहीय. त्यामुळे सेटवरच्या प्रत्येकाकडून मला या भूमिकेसाठी खूप मदत होते. या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. आणि याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. विशेष गोष्ट म्हणजे मालिकेत शर्वाणी पिल्लई माझ्या आईच्या भूमिकेत आहे. ती माझ्या खऱ्या आईप्रमाणेच सेटवर माझी काळजी घेते. सेटवरच्या पहिल्या दिवसापासूनच आम्हा दोघींचं खूप छान बॉंडिंग जमलं आहे.