अभिनेते किरण माने यांनी बिग बॉस मराठी पर्व ४ मध्ये खुप चांगली कामगिरी केली होती. या शो मधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांचे अभिनय खुप जबरदस्त असते. काही दिवसांपूर्वी ते रावरंभा या मराठी चित्रपटात हकीम चाचा या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले. आता किरण माने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करतांना आपल्याला दिसणार आहेत.
कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची या मालिकेत झळकणार आहेत. ही मालिका १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा अंदाज गावरान असल्यामुळे प्रेक्षक त्यांना डोक्यावर उचलून धरतात. मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील नावाची भूमिका त्यांनी साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. वादाच्या कारणामुळे किरण माने यांना ही मालिका सोडावी लागली.
सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची या मालिकेत किरण माने सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारणार आहेत. याची माहिती किरण माने यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत दिली आहे.
त्यांनी पोस्ट मध्ये असे लिहिले आहे- आपल्या एखाद्या भुमिकेतनं आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय… सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’… सिंधूताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे !
ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं… पाप मानलं जायचं… त्याकाळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नांव कमावेल’, हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं!
पुढे ते म्हणतात- …..संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणाऱ्या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या… संकटांचा वर्षाव झाला… पण हार मानली नाही त्यानं. “फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये !” या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं !
सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली ‘चिंधी’ ते अनाथांना हवीहवीशी माय ‘सिंधूताई’, हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये.
मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय… ‘कलर्स मराठी’वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई… नक्की बघा… आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा…
…………किरण माने.