मैत्री म्हणजे काय, तर कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी निव्वळ दुनियादारी….!! मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती आणि दिवानगी’ यातील रेषा पुसट होते आणि मग त्यातून प्रेमाला आणि मैत्रीला वेगळी कलाटणी मिळते. मैत्री आणि प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने आपल्या समोर ६ ऑक्टोबरला येतेय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
नुकतेच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.
‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांच असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत.
‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

