Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगत निर्माण केली आहे. २८ जुलै रोजी सुरुवात झालेल्या या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. मात्र, काही आठवड्यांतच या स्पर्धकांमध्ये बरेच बदल झाले. पहिल्या आठवड्यातच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला, त्यामुळे घरातल्या स्पर्धकांमध्ये खळबळ माजली होती. दुसऱ्या आठवड्यात मात्र एकाही स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागलं नाही. कारण, ‘कलर्स मराठी’ वाहिनी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे, त्या आठवड्यात कुठलाही एलिमिनेशन होऊ दिलं नव्हतं.

मात्र, तिसऱ्या आठवड्यात स्पर्धकांना मोठा धक्का बसला. कारण, या आठवड्यात एका नव्हे, तर दोन स्पर्धकांना घराचा निरोप घ्यावा लागला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सर्वप्रथम निखिल दामले यांना एलिमिनेट करण्यात आलं. निखिलच्या एलिमिनेशननंतर योगिता, सूरज, आणि अभिजीत या तिघांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. अखेर, रितेश देशमुखने योगिताचं नाव जाहीर करत तिला बाहेर पडण्याची सूचना दिली, आणि त्याचवेळी सदस्यांना हे देखील सांगितलं की या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे. त्यामुळे, एकाच दिवशी दोन सदस्य घराबाहेर गेल्याने इतर सर्व स्पर्धक चकित झाले.
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : अरबाज साठी सूरज चव्हाण एकटाच बास! वैभवला घराबाहेर काढा!
योगिता आणि निखिल या दोघांनी एकत्रच घर सोडलं. योगिता गेल्यानंतर तिच्या चांगल्या मैत्रिणी आर्याला खूप दु:ख झालं आणि तिला अश्रू अनावर झाले. रंगमंचावर आल्यावर, रितेश देशमुखने निखिल आणि योगिताचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या तीन आठवड्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवली. त्यानंतर, रितेशने या दोघांना एक विशेष पॉवर दिली. या पॉवरनुसार, या दोघांना त्यांच्या नावे असलेले म्युच्युअल फंडचे कॉइन कोणत्या एका सदस्याच्या नावावर करण्याची संधी दिली गेली.
योगिताने आर्याला आपली वारसदार (नॉमिनी) बनवलं, तर निखिलने ही संधी धनंजय, म्हणजेच डीपी दादांना दिली. त्यानंतर आर्या आणि धनंजय यांनी निखिल आणि योगिताचे आभार मानत त्यांना निरोप दिला. जाताना, योगिताने रितेश देशमुख आणि संपूर्ण ‘बिग बॉस मराठी’ टीमचे आभार मानले. तिने सांगितलं की, या तीन आठवड्यांत तिला खूप पाठिंबा मिळाला, आणि त्यामुळे ती या सर्वांची आभारी आहे.
तीन आठवड्यांच्या या प्रवासात, योगिताने अनेकदा घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे, तिला अनेकदा समजावण्यात आलं होतं. या सर्व काळात, ‘बिग बॉस मराठी’च्या टीमने तिला खूप सहकार्य केलं, आणि त्यामुळे योगिताने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
आता, घरातील उर्वरित सदस्यांपैकी पुढील आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि चौथ्या आठवड्यात काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पुढील भागांमध्ये कोणत्या नवीन वळणावर कथा जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.