Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची नुकतीच थरारक सांगता झाली, आणि यावर्षीचा हा लोकप्रिय रिऍलिटी शो अवघ्या ७० दिवसांत संपला. या पर्वात स्पर्धकांनी जोरदार टास्क खेळले, भांडणं केली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेष म्हणजे, या शोमध्ये पहिली स्पर्धक म्हणून ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री करणारी निक्की तांबोळी ठरली होती. निक्कीने संपूर्ण पर्वात आपल्या खेळामुळे आणि वादग्रस्त भूमिकांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती या पर्वाच्या सर्वात चर्चित स्पर्धकांपैकी एक ठरली, आणि तिच्या प्रत्येक कृतीची चर्चा सोशल मीडियावर होत राहिली. तरीसुद्धा तिला विजेतेपद मिळवता आले नाही.
निक्कीने सुरुवातीपासूनच शोमध्ये एक आक्रमक खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तिने टास्कमध्ये आपले कौशल्य दाखवले, आणि शोमधील इतर स्पर्धकांशी झालेल्या वादांमुळे ती कायम चर्चेत राहिली. परंतु, फाइनल च्या वेळेस तिला बिग बॉस ची ट्रॉफी उचलता आली नाही . रितेश देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे, निक्की तिसऱ्या स्थानावर राहिली आणि तिला घराचा निरोप घ्यावा लागला. ती ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणारी टॉप-३ स्पर्धकांपैकी एक होती. अंतिम फेरीत तिच्या सोबत सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे स्पर्धक होते. निक्कीने घरातून एक्झिट घेतल्यावर सूरज आणि अभिजीत हे टॉप-२ फायनलिस्ट म्हणून उभे राहिले, ज्यांच्यात अंतिम विजेतेपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.
घरातील टॉप-६ स्पर्धक गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात वोटिंग मिळवत होते. प्रत्येक स्पर्धकाच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. परंतु, अखेर विजेतेपदाचा मान सूरज चव्हाणच्या नावावर गेला. सूरजने या पर्वात आपला ठसा उमटवला आणि शेवटपर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. त्याच्या खेळातील स्थिरता, धीर आणि प्रेक्षकांनी दिलेला भरघोस पाठिंबा यामुळे त्याला विजेतेपद मिळाले. दुसरीकडे, निक्कीला तिच्या घरातून बाहेर पडण्याआधीच तिला एव्हिक्ट होण्याचा अंदाज आला होता. तिने मनाशी ठरवलं होतं की तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे, आणि तसंच झालं.
निक्की तांबोळीने शोमधून बाहेर पडल्यावर आपल्या चाहत्यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ती म्हणाली, “हा शेवट नाहीये… ही एका नव्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असं प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा.” निक्कीच्या या पोस्ट मुळे तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला.
निक्कीच्या घरातून एव्हिक्ट झाल्यानंतर तिची आई प्रमिला तांबोळी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, “सूरजसमोर कोणाचाही निभाव लागणार नाही.” त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली, कारण महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड समर्थनामुळे सूरजने विजेतेपद मिळवलं. त्यामुळे अनेकांना सूरजच विजेता होईल याची खात्री होती. निक्कीच्या खेळाची प्रशंसा करताना रितेश देशमुख यांनी तिला ‘कन्टेंटची महाराणी’ आणि ‘queen of एंटरटेनमेंट’ अशी उपमा दिली.
आता निक्की तांबोळीच्या चाहत्यांना तिच्या पुढील प्रोजेक्ट्सची प्रतीक्षा आहे. शो संपल्यावर ती कोणत्या नव्या प्रकल्पात दिसणार, कोणत्या माध्यमातून तिचे पुनरागमन होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय, तिचे अरबाज खानसोबतच्या नात्याबद्दलचे निर्णयही चर्चेचा विषय बनले आहेत. त्यामुळे तिचे चाहते तिच्या आगामी निर्णयांची आणि प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.