६ जून १६८४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठा स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. निर्माते, संदीप सिंग, ‘एव्हीएस स्टुडिओ’ आणि रवी जाधव यांनी आकाश ठोसर अभिनित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या बाल शिवाजीचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला आहे. ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.
‘बाल शिवाजी’ चित्रपटात शिवरायांचा वयवर्षं १२ ते १६ पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या रंजक गोष्टी पाहायला मिळतील.
चित्रपट निर्माते संदीप सिंग याबाबत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण ओळखतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाबद्दल फारशी माहिती नाही. रवी जाधवजींनी याबाबत कथा सांगितल्यावर मी मंत्रमुग्ध झालो. ही कथा आई आणि मुलाची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जगातील सर्वात निर्भय आणि शूर योद्धा त्यांनी कसे बनवले गेले हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.
संदीप सिंग पुढे म्हणाले, “जेव्हा मी सैराट पाहिला, तेव्हा मला माहित होते की स्क्रीन वरील नवीन मुलाकडे लाखो चाहत्यांना खुर्चीत खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. आणि हे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने सिद्धही करून दाखवले. आमच्या मते, आकाश ठोसरशिवाय कोणीही बाल शिवाजीची भूमिका करू शकत नाही.
‘एव्हीएस स्टुडिओ’चे सह-संस्थापक विशाल गुरनानी म्हणाले, “बाल शिवाजीने मराठी सिनेमाला आणखी उंचीवर नेण्याचे वचन दिले आहे आणि आम्ही जगातील सर्वात तरुण योद्ध्याची सर्वात वेधक कथा सांगण्यासाठी आलो आहोत. अशा प्रकारचा चित्रपट मराठीत बनलेला नाही. रवी जाधव सर आणि आकाश ठोसर यांच्यासोबत काम करणे हा आमचा सन्मान आणि विशेषाधिकार आहे आणि आम्ही खरोखरच उत्साहित आहोत.”
दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, “माझा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल. मी गेली नऊ वर्ष या स्क्रिप्टवर काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. चित्रपटाची कथा संदीप सिंग यांनी समजून घेतली. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो आहे.”
Avs स्टुडिओचे सह-संस्थापक अभिषेक व्यास म्हणाले, “या युगात मोठे दृश्य आणि जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये परत आणत आहेत, तेव्हा सिनेविश्वात उत्तम सिनेमॅटिक विश्व निर्माण करण्याचा आणि लोकांना आकर्षित करणारे चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाल शिवाजी ही कथा महाराष्ट्रातून निर्माण होत असली तरी ती ज्या पद्धतीने बनवली जात आहे, त्यात व्यापक दृष्टिकोन आहे. ही दृष्टी प्रत्यक्षात आणणाऱ्या रवी जाधव सरांना पाहून आम्ही खूप उत्सुक आहोत.”
‘बाल शिवाजी’ चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, सॅम खान, रवी जाधव, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. लिजेंड स्टुडिओ, एव्हीएस स्टुडिओ आणि रवी जाधव फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वर्षाअखेरीस सुरू होईल.