Aantarpath Off Air : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर १० जूनपासून सुरू झालेली ‘अंतरपाट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत गौतमी आणि क्षितिज यांच्या नात्याची गोष्ट मांडण्यात आली होती. रश्मी अनपट आणि अशोक ढगे यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय, प्रतीक्षा शिवनकर, रेशम टिपणीस, संकेत कोर्लेकर, राजन ताम्हाणे, मिलिंद पाठक, ऋषीकेश वांबूरकर यांनीही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
सुरुवातीला ‘अंतरपाट’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, पण टीआरपीच्या अभावी ही मालिका फार काळ टीकू शकली नाही. अवघ्या अडीच महिन्यांतच मालिकेचा शेवट करावा लागला, ज्यामुळे अनेक प्रेक्षकांना धक्का बसला. या मालिकेने १० जूनला सुरुवात केली होती, पण अवघ्या ७६ भागांनंतर ती संपली. मालिकेच्या शेवटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूपच कुतूहल होतं, कारण कथा त्या टप्प्यावर आणली होती की तिचं पुढे काय होईल हे समजण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती.
‘अंतरपाट’ मालिकेची सुरुवात क्षितिज, जान्हवी, आणि गौतमी यांच्या त्रिकोणी प्रेमकथेने झाली. क्षितिज, जान्हवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. परंतु घरच्यांच्या आग्रहामुळे त्याला गौतमीशी लग्न करावं लागतं. लग्नानंतरही क्षितिजच्या मनात जान्हवीच असते, ज्यामुळे गौतमीच्या जीवनात एक अदृश्य अंतरपाट येतो. काळाच्या ओघात गौतमीला क्षितिज आणि जान्हवीच्या प्रेमाबद्दल समजतं, तरीही ती आपल्या संसाराला टिकवण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे, क्षितिज मात्र गौतमीपासून दूर होऊन जान्हवीकडे परत जायचा विचार करत असतो.
Bigg Boss Marathi 5 Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या घरात मराठमोळ्या कोरिओग्राफर ची एंट्री!
मालिकेच्या शेवटाकडे दोघांचीही नाती बदलू लागतात. गौतमी आणि क्षितिजचे संबंध सुधारू लागतात आणि दोघांमध्ये एक नवीन भावना निर्माण होते. क्षितिजला जाणवतं की, त्याच्या मनात आता गौतमीसाठी प्रेम निर्माण झालं आहे, आणि तीच त्याची खरी जोडीदार आहे. या बदललेल्या नात्याच्या जाणिवेमुळे क्षितिज गौतमीला सोडायचं नाकारतो.
शेवटच्या भागात गौतमी स्वतःहून क्षितिजला घटस्फोट देण्यासाठी तयार होते आणि आपल्या माहेरी निघून जाते. गौतमीला बॅग घेऊन आलेली पाहून तिच्या माहेरच्यांना धक्का बसतो. ती त्यांना सर्व काही सांगते आणि मुंबईला निघून जायला बाहेर पडते. याचवेळी, दुसऱ्या बाजूला क्षितिजला जाणवतं की, तो गौतमीच्या प्रेमात पडला आहे आणि तिच्याशिवाय राहू शकत नाही. क्षितिजच्या या निर्णयामुळे जान्हवीला राग येतो, परंतु ती मात्र मोठ्या मनाने गौतमीकडे जाते आणि तिला थांबवते. जान्हवी गौतमीला सांगते की, आता तिचं आणि क्षितिजचं नातं पूर्ण झालं आहे आणि त्यांच्यातला अंतरपाट कायमचा दूर झाला आहे.
या प्रसंगानंतर गौतमीचं घरात पुन्हा आनंदात स्वागत होतं. तिला पुन्हा घरात प्रवेश दिला जातो आणि नव्याने तिचं व क्षितिजचं सहजीवन सुरू होतं. शेवटी, दोघेही एकमेकांसाठी खास उखाणे घेतात, जणू त्यांचं नातं नव्याने फुलतंय. गौतमी म्हणते, “नदीला सापडतो जसा नव्याने काठ…किनाऱ्याला येऊन भेटते जशी नवनवीन लाट…क्षितिज रावांच्या सोबतीने पुन्हा चालते ही वाट… कारण खऱ्या अर्थाने आमच्या दोघांमधला सरलाय आता अंतरपाट…”
Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांना 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही, कारण अभिनेत्रीने..
क्षितिजही आपला उखाणा घेतो, “वाटलं नव्हतं इतक्या सहज जुळतील रेशीमगाठी…आता पुढचा माझा प्रत्येक जन्म असेल फक्त गौतमीसाठी…” या आनंददायी प्रसंगाने ‘अंतरपाट’ मालिकेचा शेवट झाला.
मालिका संपल्यानंतर, ‘अंतरपाट’च्या जागी ‘दुर्गा’ नावाची नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेत रुमानी खरे आणि अंबर गणपुळे हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, आणि नम्रता प्रधान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. ‘दुर्गा’ ही मालिका एका मुलीच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या तिच्या संघर्षाची कथा मांडेल. त्यामुळे, आता प्रेक्षकांची नजर ‘दुर्गा’ मालिकेकडे लागली आहे.