कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा ’या आगळ्यावेगळ्या सोहळयाची संकल्पना फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी यशस्वी करून दाखविली. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ आणि ओंकार भोजने यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. अभिनेता शुभंकर तावडे याच्या सुरेख गणेश वंदनेने सोहळ्याला सुरवात झाली. शिव ठाकरे, मानसी नाईक, वैदही परशुरामी कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. हा नेत्रदीपक सोहळा लवकरच ‘फक्त मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गीत आणि ‘महाराष्ट्र शाही’र चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीतासाठी गौरविण्यात आला. या दोन्ही चित्रपटांसाठी अजय आणि अतुल यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून श्रेया घोषाल(‘वेड’) आनंदी जोशी (तमाशा LIVE) आणि सर्वोत्कृष्ट गायक म्हणून आदर्श शिंदे(रावरंभा)पुरस्काराचे मानकरी ठरले.’घर बंदूक बिरयानी’ सर्वोत्कृष्ट कथा (नागराज मंजुळे, हेमंत अवताडे), ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट पटकथा(मधुगंधा कुलकर्णी-परेश मोकाशी) तर सर्वोत्कृष्ट संवादाचा मान ‘घर बंदूक बिरयानी’ (नागराज मंजुळे, हेमंत अवताडे) ने पटकावला. ‘चौक’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी उपेंद्र लिमये तर ‘टाईमपास ३’ चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी संजय नार्वेकर यांना गौरवण्यात आले. सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी ख़ुशी हजारे (वेड) तसेच सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी अशॊक सराफ (वेड) यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट) यांचा सन्मान करण्यात आला. परेश मोकाशी यांनी(वाळवी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला. ‘अनन्या’ चित्रपटासाठी हृता दुर्गुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘वाळवी’ चित्रपटासाठी स्वप्नील जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान ‘वाळवी’ला मिळाला. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला या सोहळ्यात विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शनासाठी केदार शिंदे तर अभिनयासाठी अंकुश चौधरी याचा गौरव यावेळी करण्यात आला. ‘वेड’ चित्रपटाने पॉप्युलर चित्रपटाचा ‘किताब पटकावला.
बॉलीवूडमधले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीला मानवंदना देत त्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविलेल्या कलाकृतींचा सन्मान यावेळी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार आणि त्याला मिळणारी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद यामुळे ‘फक्त मराठी सिनेसन्मान सोहळा २०२३’ नेत्रदीपक झाला. फक्त मराठी’ वाहिनीच्या प्रेक्षकांना हा सोहळा लवकरच बघायला मिळणार आहे.