मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष शो

अनुप जगदाळे दिग्दर्शित रावरंभा हा चित्रपट येत्या २६ मे ला सिनेमा गृहात रीलीज होणार आहे. नुकताच आज २४ मे ला या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि इतर कलाकार प्रीमियरला उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ढोल ताशांचा गजर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला. दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाची मनोरंजन विश्वात बरीच चर्चा सुरू आहे. सिनेनाटय सृष्टीतील कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या विशेष शोला आवर्जून उपस्थित होती. सर्व कलाकारांच्या व तंत्रज्ञाच्या सहकार्यामुळे उत्तम चित्रपट करता आल्याची भावना निर्माता शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली तर सुंदर कलाकृतीचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी बोलून दाखविला. येत्या शुक्रवारी २६ मे ला ‘रावरंभा’ चित्रपटगृहात दाखल होत आहे.

आजवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास उलगडून दाखवत, एका मोरपंखी प्रेमकहाणीची किनार असलेला ‘रावरंभा’ चित्रपट मनाला स्पर्शून जात असल्याची भावना उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केली. चित्रपटाच्या निर्मीती आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवर यावेळी देत होते.

‘राव’ आणि रंभा’ यांचं फुलत आलेलं प्रेम, त्यातच स्वराज्यावर चालून आलेलं बहलोलखान रुपी संकट शिवरायांचे शिलेदार कसे परतवून लावतात? हे दाखवताना ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा म्हणजे ‘रावरंभा’ चित्रपट. अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून ‘राव’ आणि रंभा’ जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत, यांच्यासोबत शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल,मयुरेश पेम, अश्विनी बागल, शशिकांत पवार, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, प्रशांत नलवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

सिद्धहस्त लेखक प्रताप गंगावणे यांच्या लेखणीतून ‘रावरंभा’ चित्रपट साकारला आहे. पटकथा आणि अंगावर काटे आणणारे जबरदस्त संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. बॉलीवूडच्या तोडीचे छायांकन संजय जाधव यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. विक्रम धाकतोडे आणि आकाश पेंढारकर यांनी चित्रपटाच्या मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.

अॅक्शन सीन, सुमधुर संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी ‘रावरंभा’ चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘रावरंभा’ च्या टीमने दाखवून दिले असून सोबत उत्तम प्रमोशन आणि मार्केटिंग या जोरावर ‘रावरंभा’ चित्रपट येत्या शुक्रवार पासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल यात शंका नाही.

Leave a Comment