Swarada Thigale : मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक खास स्थान निर्माण करू शकली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमुळे ती रोजच्या जीवनात प्रेक्षकांना भेटत होती. मात्र, आता ती या मालिकेत दिसणार नाही, ही बातमी समजल्यावर अनेक चाहते निराश झाले. तेजश्रीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या गोष्टीबद्दल खंत व्यक्त केली. तिच्या जागी आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) ही मुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वरदा मालिकेचा भाग झाल्यामुळे साहजिकच तिची आणि तेजश्रीची तुलना होणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. यावर स्वरदानेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्वरदा ठिगळेने तेजश्रीची जागा घेत मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत एन्ट्री केली आहे. ती आता या मालिकेच्या सेटवर पोहोचली असून तिने शूटिंगलाही सुरुवात केली आहे. मात्र, तेजश्रीच्या मालिकेतून एक्झिट झाल्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणाऱ्या चाहत्यांचा सूर उमटत आहे. एका चाहत्याने याबाबत लिहिले की, “खरं सांगायचं तर कलाकारांनी अशा रिप्लेसमेंटच्या भूमिका स्विकारू नयेत. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी त्यांची तुलना पूर्वीच्या कलाकाराशी केली जाते. यामुळे त्यांना प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागतो.”
या कमेंटवर एका सोशल मीडिया पेजने उत्तर दिलं, “तुमचं म्हणणं खरं आहे. तुलना होणं अटळ आहे. पण कलाकार आपलं काम करत राहतात. उदाहरण द्यायचं झालं, तर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजनाच्या भूमिकेत रिप्लेसमेंट आली होती. त्यानंतर रूपाली प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि ती यशस्वी ठरली. आता ‘प्रेमाची गोष्ट’बाबत काय घडतंय, ते पाहावं लागेल.”
स्वरदाने या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, “आजही कलेचे असे खरे चाहते आहेत म्हणूनच कलाक्षेत्रात उत्कृष्ट काम करत राहण्याची प्रेरणा मिळते. माझ्या नवीन शोला मिळालेल्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी तुमचं मनापासून आभार.”
Akshaya Devdhar : पाठक बाईंचे नवीन वर्षातील हे 3 नवे संकल्प..काय म्हणाली अक्षया..
स्वरदाबद्दल सांगायचं झालं, तर तिने यापूर्वी ‘सुराज्य सौदामिनी’ आणि ‘माझे मन तुझे झाले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला आहे. आता स्वरदा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.