Abeer Gulal off Air : कलर्स मराठीवरची लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या दिवसांचे शूटिंग सध्या जोरात सुरू असून, मालिकेच्या संपूर्ण टीममध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि जिद्द दिसून येत आहे. ‘अबीर गुलाल’ ही मालिका २७ मे रोजी सुरू झाली होती, म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच तिला समाप्तीला आणले जात आहे. या मालिकेतील श्री, अगस्त्य आणि शुभ्रा ही प्रमुख पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. याच कारणामुळे ‘अबीर गुलाल’ला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी टीआरपीच्या प्रभावामुळे मालिकेला संपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
या मालिकेतील प्रमुख भूमिकांमध्ये अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री पायल जाधव, आणि गायत्री दातार या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, प्रेक्षकांच्या मनात स्थिरावलेली ही मालिका इतक्या लवकर बंद होणार असल्याचं ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या बंद होण्याच्या निर्णयाची माहिती टीमला देण्यात आली. यावर प्रमुख अभिनेता अक्षय केळकरने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अक्षयने या बातमीबद्दल बोलताना सांगितलं की, “सध्या आमचं शूटिंग अगदी जोरात सुरू आहे. पण दोन दिवसांपूर्वीच आम्हाला कळलं की मालिका बंद होतेय. तरीसुद्धा आमचं शूटिंग सुरू असताना तितकीच ऊर्जा आणि उत्साह आहे, जेव्हा मालिका सुरू झाली होती. उरलेले सहा दिवस आम्ही अजून कमाल शूट करायचा प्रयत्न करू, अशीच जिद्द आम्हा सर्वांमध्ये आहे.”
Tharal Tar Mag : ठरलं तर मग मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात होणार आई.. दिली मोठी गुड न्यूज़..
अक्षयने एका मुलाखतीत त्याच्याकडे विचारलं की, मालिकेच्या अचानक बंद होण्याच्या निर्णयाने त्याला धक्का बसला का, त्यावर तो म्हणाला, “हो, नक्कीच धक्का बसला, यात काहीच प्रश्न नाही. कारण हे धक्कादायक होतंच. पण या निर्णयाच्या पाठीमागे प्रत्येकाचं स्वतःचं एक कारण असतं. ती माणसं त्यांच्या ठिकाणी योग्य निर्णय घेत असतात, असं आता मी समजू शकलो आहे. पहिल्यांदा हे असं काही झालं, तेव्हा खूप वाईट वाटलं होतं, पण आता मात्र त्याचा त्रास होत नाही. फक्त इतकं मात्र खरं की, मला पुन्हा नव्याने स्ट्रगल करावं लागेल. हे सगळ्यांच्या वाट्याला येतं, हे मला माहिती आहे. आणि तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, सध्या मी फ्री आहे.”
स्ट्रगल म्हणजे पुन्हा एक नवी सुरुवात असते आणि त्यामध्ये काहीशी भीती असणं साहजिकच आहे, हे कबूल करताना अक्षय म्हणाला, “स्ट्रगल करताना भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण असा कोण माणूस आहे ज्याला भीती वाटत नाही? तुम्ही फार लोकप्रिय नसता किंवा अजिबात प्रसिद्ध नसता, तेव्हा हा मधला काळ असतो तो अभिनेता म्हणून फार कठीण असतो.”
याच दरम्यान, काही दिवसांपूर्वी अक्षयने अगस्त्यच्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि चाहत्यांना निरोप देण्याची संकेत दिली होती. या पोस्टद्वारे त्याने अप्रत्यक्षपणे मालिकेच्या समाप्तीची हिंट दिली होती, जिचा अर्थ चाहत्यांना काहीसा समजला होता.
‘अबीर गुलाल’ मालिकेच्या संपण्याने अनेक प्रेक्षकांना निराशा वाटत असली तरी कलाकारांच्या मेहनतीने साकारलेली ही भूमिका त्यांच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव राहणार आहे.