Janhavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खूपच गाजला, आणि या शोतील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. काही स्पर्धकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली, तर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव कायम चर्चेत असायचं. तिच्या वागणुकीमुळे ती अनेकदा प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली होती.
शोच्या सुरुवातीला प्रेक्षकांनी तिला खूप ट्रोल केलं, पण जसजसा शो पुढे गेला तशी जान्हवीची कामगिरी बदलली. ती “टास्क क्वीन” म्हणून घराबाहेर पडली, आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांवर तिची छाप पडली. मात्र, घराबाहेर आल्यानंतरही जान्हवी विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आणि यावेळी कारण आहे तिचे ‘बिग बॉस’मधील कपडे.
जान्हवी किल्लेकरचा कपड्यांचा लिलाव
जान्हवीने अलीकडेच जाहीर केलं आहे की, ती ‘बिग बॉस’च्या घरात नेलेले कपडे लिलावात ठेवणार आहे. हा निर्णय का घेतला, याबद्दल तिने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. मुलाखतीत ती सांगते की, ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी तिने तब्बल 100 कपडे खरेदी केले होते. ती म्हणाली, “मी कुठलंही कोलॅबरेशन केलेलं नव्हतं. माझ्या कपड्यांची निवड मी स्वतः केली होती. आता जेव्हा मी घराबाहेर आले, तेव्हा सगळे कपडे माझ्या बेडरूममध्ये इतके भरले की, जागाच शिल्लक राहिली नाही. म्हणून मी ठरवलं आहे की, हे कपडे लिलाव करणार आहे.”
100 कपड्यांची खास निवड
जान्हवीने तिच्या कपड्यांविषयी अधिक माहिती देताना सांगितलं की, तिने 100 कपडे खरेदी केले होते, त्यात 40 नाईट सूट होते. ती पुढे म्हणाली, “मला दुसऱ्यांनी डिझाईन केलेलं फारसं आवडत नाही. मी स्वतःच माझ्या कपड्यांची निवड करते. कारण प्रत्येकाला माहीत असतं की, त्याला काय चांगलं दिसतं आणि कोणते कपडे त्याला कम्फर्टेबल असतात. त्यामुळे मी असे कपडे निवडले की ज्यात मी एकाच वेळी चांगलीही दिसेन आणि आरामदायकही वाटेन.”
कपड्यांचा लिलाव का?
जान्हवी पुढे सांगते की, ‘बिग बॉस’मधील तिच्या कपड्यांमुळे आता तिच्या बेडरूममध्ये खूपच गोंधळ झाला आहे. म्हणूनच ती ठरवते की, त्या कपड्यांचा लिलाव करावा. “लेके जाओ, लेके जाओ,” असं म्हणत ती या लिलावाविषयी बोलते. हे कपडे विकून ती काही समाजसेवी काम किंवा इतर उपक्रमांसाठी पैसे वापरण्याचा विचार करत आहे, असंही सूचित केलं जातंय.
जान्हवी किल्लेकर सध्या मराठी मालिकांमध्ये सक्रिय आहे. ती मुख्यत्वे खलनायिकांच्या भूमिका साकारते, ज्यामुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. याशिवाय, जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या फॅन्ससोबत सतत संपर्कात राहते आणि तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील गोष्टींविषयी माहिती शेअर करत असते.
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांची तूफान भेट..वीडियो वायरल
जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस मराठी’मध्ये जरी खूप वादग्रस्त प्रवास केला असला, तरी ती आता एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. तिच्या कपड्यांचा लिलाव हा एक अनोखा निर्णय आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.