Kedar Shinde : अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा संपन्न झाला, ज्यात गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’ हा शो कायमच चर्चेत असतो, कारण यात स्पर्धकांमध्ये होणारे वाद-विवाद, धमाल मस्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य प्रेक्षकांना खूप आकर्षित करतात. मात्र, या शोमधील स्पर्धकांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या विषयावर कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
केदार शिंदे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंग आणि ‘बिग बॉस’मधील अनुभवांवर मोकळेपणाने संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, फक्त रितेश भाऊच नाही, तर त्यांनाही या शोमुळे ट्रोल करण्यात आलं. त्याबद्दल ते म्हणाले, “मी नेहमी विचार करतो की हल्ली ट्रोलर्स खूप वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलतात. डायरेक्ट घरच्यांवर टिका केली जाते, आणि हे खूपच चुकीचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला माझं वागणं किंवा निर्णय आवडलं नाही तर त्यावर टीका करा, पण व्यक्तिगत स्तरावर येऊन आमच्या घरच्यांवर, म्हणजे आई, पत्नी किंवा मुलींवर बोलणं हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.”
केदार शिंदे पुढे म्हणाले, “आपली महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही की आपण लोकांच्या घरच्यांवर टीका करू. आपण नेहमी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करतो, लोकांना त्या संस्कारांचं महत्त्व सांगतो, मग आपल्यालाच ते संस्कार कसे सांभाळता येतील याचा विचार करायला हवा.”
केदार शिंदे यांच्यासाठी ‘बिग बॉस’ हा पहिलाच अनुभव होता, आणि हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खास होता. मुलाखतीत त्यांनी या प्रवासाबद्दलही सांगितलं. शोमधील इतर सदस्यांविषयी त्यांनी आपली मतं मांडली. त्यांना ‘बिग बॉस’च्या घरातील काही गोष्टी खूप आवडल्या, तर काही गोष्टी त्यांना खूप अवघड वाटल्या.
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांची तूफान भेट..वीडियो वायरल
पुढील सीझनबद्दल विचारल्यावर त्यांनी खुलासा केला की, आता पुढचा ‘बिग बॉस’ सीझन कधी येणार आणि त्यातही रितेश देशमुखच होस्ट करणार का, यावर अजून निर्णय घेतलेला नाही. पण ते म्हणाले की, प्रेक्षकांना भविष्यातही तितकाच मनोरंजनाचा अनुभव मिळेल याची खात्री आहे.
केदार शिंदे यांच्या या विधानांनी ट्रोलिंगसारख्या संवेदनशील विषयावर एक माणूस म्हणून त्यांचं स्पष्ट आणि मनमोकळं मत समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’सारखा शो जरी मनोरंजनासाठी असला, तरी त्यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना, त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानाने वागवायला हवं, असा त्यांचा संदेश स्पष्ट आहे.