Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj : ‘बिग बॉस मराठी’च्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने (पॅडी) कमी मतं मिळाल्यामुळे घरातून एक्झिट घेतली. तब्बल ६२ दिवस घरात राहिल्यानंतर त्याने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला. पॅडीच्या एक्झिटनंतर त्याची मैत्रीण अंकिता वालावलकर भावुक झाल्याचं दिसलं होतं. पंढरीनाथचा हा प्रवास संपल्यानंतर त्याने घराबाहेर येताच अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या घरातील अनुभवांवर भाष्य केलं, तसेच इतर सदस्यांच्या स्वभावाविषयी आणि त्यांच्यातील नात्यांविषयी आपल्या मतांची स्पष्ट मांडणी केली.
घरात गेल्या काही दिवसांपासून अरबाज आणि निक्कीच्या नात्याचा एक वेगळा ड्रामा रंगला होता, ज्यामुळे घरातील वातावरण बदललेलं दिसत होतं. या नात्याविषयी पॅडीने ‘सकाळ’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला आणि त्याच्या मनातील रोखठोक मतं मांडली. त्याच्या या मतांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.
पंढरीनाथला निक्की आणि अरबाज यांच्यातील मैत्री आणि नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना पॅडीने स्पष्टपणे सांगितलं, “त्यांच्यात कसली मैत्री? ती फक्त एक फालतुगिरी होती, एक दिखावा. मी आणि योगिता, किंवा मी आणि अंकिता, यांच्यातली मैत्री खरी होती, प्रामाणिक होती. पण, निक्की आणि अरबाजने मात्र काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फक्त शोसाठी एक अफेअर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. उगाच गुलूगुलू बोलणं, एकत्र फिरणं, हे सर्व केवळ नाटक होतं. घरात मित्र बनवणं ठिक आहे, पण अफेअरचं नाटक करणं मला योग्य वाटत नाही. त्यांचं असं वागणं फक्त दाखवण्यासाठी होतं.”
पंढरीनाथने निक्की आणि अरबाजच्या एकत्र झोपण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. तो म्हणाला, “निक्की आणि अरबाज एका बेडवर झोपायचे. आता हे लोक नुकतेच एकमेकांना भेटले होते, त्यांना फार जुनी ओळख नव्हती, तरी त्यांचं असं वागणं खूप विचित्र होतं. वर्षानुवर्षं एकत्र असलेली जोडपीसुद्धा असं वागत नाहीत, जसं हे दोघं ‘बिग बॉस’च्या घरात वागत होते. हे केवळ एक दिखावा होता.”
पॅडीने पुढे असंही स्पष्ट केलं की, निक्की आणि अरबाजचं नातं फक्त शोसाठीच होतं. तो म्हणाला, “निक्की आणि अरबाज यांचं नातं केवळ शोसाठी निर्माण करण्यात आलं होतं. त्यांचा हा दिखावा त्यावेळी उघडकीस आला, जेव्हा निक्कीची आई घरात आली. निक्कीच्या आईने वास्तविक परिस्थिती काय आहे, हे स्पष्टपणे सांगितलं, आणि त्यामुळे निक्कीला आपली चूक उमगली. आईच्या या हस्तक्षेपानंतर निक्की बदलली. तिने त्यानंतर अभिजीत सावंतशी चांगल्या प्रकारे बोलायला सुरुवात केली.”
यावर अधिक भाष्य करताना पंढरीनाथ म्हणाला, “अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्कीला एक भावनिक आधार हवा होता, आणि तो आधार तिने अभिजीत सावंतच्या रुपात शोधला. ती घरात फक्त भांडणं आणि वाद करूनच आपला खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अभिजीत मात्र खूप चतुराईने आपला खेळ पुढे नेत आहे. तो प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत आहे.”
पंढरीनाथने या मतांद्वारे निक्की आणि अरबाजच्या नात्याच्या फक्त बाहेरून दिसणाऱ्या भागावरच नाही, तर त्यांच्या वागणुकीच्या अंतरंगावरही प्रकाश टाकला. त्याने असं सूचित केलं की, निक्की आणि अरबाजने जे नातं निर्माण केलं ते केवळ पब्लिसिटीसाठी आणि शोमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी होतं.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या शोमध्ये आता अंतिम आठवड्याला सुरुवात झाली आहे. निक्की तांबोळीने ग्रँड फिनालेसाठी आपली जागा पक्की केली आहे. मात्र, उर्वरित सहा सदस्य आता नॉमिनेट झाले असून, त्यांच्यापैकी एक सदस्य मिडवीक एलिमिनेशनमध्ये घराचा निरोप घेणार आहे. शो आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की, या सात सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’चा अंतिम विजेता ठरेल.