Priya Bapat : प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्या जोडीला आदर्श जोडप्याचं उदाहरण मानलं जातं. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांविषयीचे फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात, ज्यातून त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येतं. पण, त्यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असली तरीही अजून ते आईबाबा झालेले नाहीत. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये याबाबत कुतूहल असतं, आणि बरेचदा लोकं त्यांना मूल का नाही याबाबत प्रश्न विचारतात. यावरच प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचं मन मोकळं केलं.
प्रियाने अलीकडेच एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि उमेशच्या नात्याबद्दल थेटपणे बोललं. तसेच, लग्नानंतर मूल नसल्यावर लोकं वारंवार प्रश्न विचारतात यावरही ती स्पष्टपणे बोलली. प्रियाने सांगितलं की, “मी लग्न मूल होण्यासाठी नाही केलं. माझं लग्न उमेशसोबत आहे कारण मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. आम्ही मूल जन्माला घालायचं ठरवलं तर ते आम्ही ठरवू, पण ते का, कधी आणि कसं याबद्दल कोणाला सांगावं असं मला वाटत नाही.” उमेशचंही याबाबत मत असं आहे की, “हे आपलं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यात दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये.”
ती पुढे म्हणाली, “आता या प्रश्नांची इतकी सवय झाली आहे की थकल्यासारखं वाटतं. प्रेम असो, की लोकांच्या अपेक्षा, याचा सतत विचार करत बसणं कठीण होतं. माझ्या जवळच्या लोकांनीही कधी इतक्यांदा मला विचारलं नाहीये. पण, बाहेरच्या लोकांना हा प्रश्न सतत विचारायची गरज का वाटते, हेच मला कळत नाही. एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर एक काकू मला विचारायला आल्या, ‘गुड न्यूज कधी?’ त्यावेळी मला खरंच राग आला होता. हा प्रश्न पूर्णपणे माझा, उमेशचा आणि आमच्या कुटुंबाचा आहे, मग लोकं मला का विचारतात? मग हळूहळू मला लक्षात आलं की लोकांना आमच्याबद्दल प्रेम आणि आपलेपणाची भावना आहे, म्हणून ते विचारतात.”
प्रिया पुढे बोलताना म्हणाली, “मला असं वाटतं की लग्न झालं की मूल हवं, हा प्रेशर समाजाने स्त्रियांवरून काढून टाकायला हवा. माझ्या लग्नाला १३ वर्षं झाली, आणि आमच्याकडे मूल नाहीये, पण हा माझा निर्णय आहे. कदाचित मला पुढे जाऊन ४२व्या वर्षी मूल हवं असं वाटेल, तेव्हा मी मूल जन्माला घालीन. आणि जर नाही वाटलं, तर नाही घालणार. त्यामुळे हे मूल जन्माला घालणं, न घालणं हा माझा खासगी निर्णय आहे.”
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांची तूफान भेट..वीडियो वायरल
तिच्या मते, “माझ्यावर किंवा कोणत्याही स्त्रीवर ‘लग्न झालंय म्हणजे मूल हवं’ असा दबाव टाकणं थांबवलं पाहिजे. समाजात एक अलिखित नियम आहे की लग्न झालं की मूल जन्माला घातलंच पाहिजे, पण मला हा नियम पटत नाही. मुलं असणं किंवा नसणं हे पूर्णपणे त्या जोडप्याच्या निर्णयावर अवलंबून असावं.”