Marathi Actress about hindi movies casting : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, वैभव तत्ववादी, अमेय वाघ, गिरीजा ओक, अनुजा साठे, सौरभ गोखले, श्रुती मराठे अशी मराठी कलाकारांची एक मोठी यादी आहे, ज्यांनी हिंदी चित्रपटांत कामं केली आहेत आणि काहीजण सातत्याने हिंदी प्रेक्षकांसमोर येत आहेत.
मात्र, बऱ्याचदा असं दिसून येतं की मराठी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटांमध्ये कामवाल्या बाईच्या भूमिका दिल्या जातात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वणिता खरातने ‘कबीर सिंग’ चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे अभिनेत्री तृप्ती खामकरने ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटातही कामवाल्या बाईची भूमिका केली होती. याबद्दल चर्चा करताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, मराठी अभिनेत्रींना हिंदीत अशा भूमिका का दिल्या जातात? याच प्रश्नाचं उत्तर तृप्ती खामकरने दिलं आहे.
Priya Bapat : प्रिया बापट ला मूल का नाही? प्रिया यावर स्पष्टच बोलली..ट्रोलर्स ला केलं शांत
अभिनेत्री तृप्ती खामकरने अलीकडेच ‘सर्व काही’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर खुलासा केला. मुलाखतीत बोलताना तृप्तीने सांगितलं की, मराठी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटांत कामवाल्या बाईच्या भूमिका का दिल्या जातात, याचं कारण काय आहे. तिने सांगितलं, “कबीर सिंग चित्रपटात जाड बाई झाडू घेऊन धावताना दिसते, ती मी नव्हते. मी या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं, पण त्यातलं काम इतकंच होतं.” मुलाखतकाराने विचारलं, “पण तू नेहमी कामवाल्या बाईच्याच भूमिका का करतेस?”
त्यावर तृप्ती हसत म्हणाली, “आता नाही करते…पण बर्याच वर्षांपर्यंत मी कामवाल्या बाईच्याच भूमिका केल्या आहेत. अर्बन कंपनीची कामवाली, धर्मा प्रोडक्शनची कामवाली…कितीतरी प्रकारच्या कामवाल्या बाईच्या भूमिका मी साकारल्या आहेत.” त्यावर मुलाखतकार म्हणाले, “मी असं बघितलं आहे की मराठीतील बऱ्याच नवोदित आणि मध्यमवयीन अभिनेत्री हिंदी चित्रपटांत कामवाल्या बाईच्या भूमिकांमध्येच दिसतात, त्याचं कारण काय असावं?”
त्यावर तृप्तीने याबद्दलचं सत्य उघड केलं. ती म्हणाली, “हे खरोखरच दुर्दैवी टाइपकास्टिंग आहे. कारण तुम्ही मराठी आहात, तुम्हाला मराठी बोलता येतं आणि तुम्ही हिंदीत मराठी एक्सेंट वापरू शकता, त्यामुळे या भूमिका तुम्हाला दिल्या जातात. त्यात जर तुम्ही जाड असाल तर बाईंशी जुळणारं काम त्यांना तुमच्याकडे देण्याची संधी मिळते. मी अनेकदा ऑडिशनसाठी वेस्टर्न कपडे घालून गेले आहे, तेव्हा लोकं म्हणतात, ‘अरे व्वा, तू खूप चांगली दिसतेस…पण साडी आणली आहेस का?’ असा प्रश्न ते विचारतात. हाच दृष्टिकोन हिंदी सिनेमात मराठी अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांच्या मागे असतो.”
तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल यांच्यासोबतच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’ चित्रपटात ती पोलिसाच्या भूमिकेत झळकली होती. त्याआधी करीना कपूर, तमन्ना भाटिया आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबतच्या ‘क्रू’ चित्रपटातही तृप्ती काम करताना दिसली होती. तिचा अभिनय प्रेक्षकांनी आवडला असून, आता तिने कामवाल्या बाईच्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे.
तृप्ती खामकरने आपल्या अनुभवातून हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांवर भाष्य केलं, ज्यामुळे टाइपकास्टिंगचा मुद्दा अधोरेखित होतो. मराठी असल्यामुळे हिंदीतल्या अनेक भूमिकांमध्ये त्यांना एका ठराविक चौकटीत बांधून पाहिलं जातं, आणि हेच तृप्तीने या मुलाखतीत मोकळेपणाने सांगितलं.