Driving Licence News : सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने हलक्या मोटर वाहन (LMV) परवानाधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता, ज्यांच्याकडे हलक्या मोटर वाहन चालवण्याचा परवाना आहे त्यांना ७५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे व्यावसायिक वाहने चालवता येणार आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे अनेक ड्रायव्हर्स आणि विमा कंपन्यांमधील वाद मिटण्याची शक्यता आहे.
२०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता, ज्यात LMV परवाना असलेल्या व्यक्तींना ७५०० किलोग्रॅम वजनापर्यंतची वाहने चालवण्यास परवानगी दिली होती. हा निर्णय आजही कायम ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात वाढीसाठी LMV परवाना धारक कारणीभूत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे किंवा आकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हा कायदेशीर मुद्दा विमा कंपन्यांसाठी अनेकदा अडचणींचा विषय ठरला होता. अपघाताच्या वेळी अनेक वेळा विमा कंपन्या या कारणाने नुकसान भरपाई देण्यास नकार देत होत्या, की संबंधित व्यक्तीकडे वाहतुकीचे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, फक्त LMV लायसन्स होता. या मुद्द्यावर मोटार अपघात दावा न्यायाधिकरण (Motor Accident Claims Tribunal – MACT) आणि इतर न्यायालयांनी विमाधारकांच्या बाजूने निर्णय देत, विमा कंपन्यांना दावे भरण्याचे आदेश दिले होते. परंतु, विमा कंपन्यांनी यावर आक्षेप घेतला होता आणि याला आव्हान दिले होते. त्यांच्या मते, न्यायालये आणि न्यायाधिकरणे या प्रकारच्या प्रकरणांमध्ये विमाधारकांच्या बाजूने निर्णय देत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसतो.
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय संविधान पीठाने या प्रकरणात सुनावणी घेतली आणि पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे विमा कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण कंपन्या या आधारे विमा देण्यास टाळाटाळ करत होत्या. आता या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे की, हलक्या मोटर वाहन परवानाधारकांना ७५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे वाहने चालवण्याची मुभा आहे.
Priya Bapat : प्रिया बापट ला मूल का नाही? प्रिया यावर स्पष्टच बोलली..ट्रोलर्स ला केलं शांत
यामध्ये हलक्या वाहनांमध्ये फक्त कारच नाही, तर छोटा हत्ती आणि इतर हलकी व्यावसायिक वाहने देखील समाविष्ट आहेत. याचा अर्थ असा की आता LMV परवानाधारकांना अशा हलक्या वाहनांना रस्त्यावर चालविण्याचा अधिकार आहे. मात्र, ट्रक किंवा त्याहून मोठ्या वजनाची वाहने चालविण्यासाठी वेगळा परवाना घेणे अनिवार्य असेल.
२०१७ मध्ये “मुकुंद दिवांगन विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी” या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला होता की, ७५०० किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे वाहन देखील हलक्या मोटर वाहन (LMV) श्रेणीतच येते. याच निर्णयाला संविधान पीठाने देखील मान्यता दिली आहे, ज्यामुळे आता LMV परवानाधारकांना ही वाहने चालविण्यास कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे आता LMV परवाना असलेल्या चालकांना त्यांच्या परवान्याच्या मर्यादेत राहून, ७५०० किलोपेक्षा कमी वजनाची व्यावसायिक वाहने चालविण्याची परवानगी मिळाली आहे.